Breaking news

इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये माणुसकीचा झरा: एकजुटीने वाचवला एक जीव

लोणावळा : आजच्या तंत्रज्ञानप्रधान, वेगवान आणि अनेकदा स्वार्थी वाटणाऱ्या जीवनशैलीत माणुसकी, आपुलकी आणि सहकार्याचे दाखले क्वचितच पाहायला मिळतात. मात्र, 2 मे 2025 रोजी इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये घडलेली घटना याला अपवाद ठरली आणि खऱ्या अर्थाने समाजधर्म म्हणजे काय, हे दाखवून दिलं.

     सकाळी अंदाजे 7:45 वाजता, इंद्रायणी एक्सप्रेसच्या D8 बोगीत प्रवास करत असलेले श्री. सुधीर (राहणार – मुलुंड) यांना कर्जत-लोणावळा दरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या तब्येतीबाबतचा पहिला संदेश "इंद्रायणी पासधारक ग्रुप"वर 7:47 वाजता पोहोचला. हा संदेश मिळताच अनेकांनी तातडीने प्रतिसाद दिला. “D8 बोगीत पेशंट आहे, कृपया त्वरित मदत करा” या एका संदेशाने धावत्या रेल्वेतील प्रवासी जागे झाले. 7:55 वाजता, लोणावळा स्थानक गाठण्यापूर्वीच स्टेशनवरील प्रवाशांनी आणि ग्रुप सदस्यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून आपत्कालीन मदतीची तयारी केली. बोगीत असलेल्या प्रवाशांनी प्राथमिक वैद्यकीय मदत सुरू केली.

      8:03 वाजता इंद्रायणी एक्सप्रेस लोणावळा स्थानकात पोहोचली. तिथे आधीच तयार असलेल्या ग्रुप सदस्यांनी कोणतीही वेळ न दवडता श्री. सुधीर यांना तात्काळ श्रद्धा हॉस्पिटल, लोणावळा येथे हलवले. या मदतकार्यामध्ये श्री. देशमुख, मारुती झुंजारराव, नितेश गायकवाड, सागर महाडीक, शिवदास केळकर, महेश हुंडारे, प्रणय अंभुरे यांचं विशेष योगदान होतं. काहींनी हॉस्पिटलमध्ये थांबून वैद्यकीय तपासणीची खात्री केली, तर काहींनी श्री. सुधीर यांना उपचारानंतर स्वतःच्या वाहनाने त्यांच्या घरी, मुलुंड येथे सुखरूप पोहोचवलं.

या घटनेतून माणुसकीचं खरं रूप दिसलं. अनोळखी व्यक्तीसाठी वेळ, ऊर्जा, संसाधन आणि काळजी देणारे हे प्रवासी म्हणजेच समाजाचे खरे हिरो. कोणतीही वैयक्तिक ओळख नसतानाही, केवळ एक संदेश आणि सहवेदना यांच्या आधारावर त्यांनी एक जीव वाचवला. 

हा क्षण केवळ अपघात नव्हता, तर समाज म्हणून आपल्या सजगतेची, तत्परतेची आणि माणुसकीची कसोटी होती आणि ती आपण लीलया पार केली. या खऱ्या नायकांना मनःपूर्वक सलाम. ही प्रेरणादायी घटना प्रत्येकासाठी शिकण्यासारखी आहे  संकटाच्या वेळी एकमेकांच्या मदतीला धावणं, हाच खरा समाजधर्म! श्री. राहुल काळभोर, इंद्रायणी पासधारक कुटुंब सदस्य

इतर बातम्या

नगरपालिका बिल देत नसल्याचा निव्वळ कांगावा ! ठेकेदारांने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामासाठी वापरला निकृष्ट दर्जा दगड; तंबी देताच - कामगार लग्न सोहळ्याला गेले असल्याचे कारण देत थांबवले काम