Dehugaon News l लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत जगतगुरु संत तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 340 व्य पालखी सोहळ्याचे प्रस्तान वरुणराजाच्या उपस्थितीत राज्यातील हजारो वैष्णव वारकऱ्यांच्या साक्षीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिंडी क्रमांक 28 मधील शिवाजी नारायण शिंदे व माऊली महाराज कदम या वारकऱ्यांच्या हस्ते पालखी पूजन करून करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापूजा करून आरती केली आणि वरुण राजाने जलाभिषेकाला सुरवात केली.
हे प्रस्तान दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास झाले. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पालखी येथील पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्यात विसावली. वारकऱ्यांचा टाळ मृदंगाचा निनाद, विना तुतारी, टाळ, चिपळ्यांच्या तालावर मंत्रमुग्ध झालेले वारकरी ‘‘ज्ञानोबा- तुकाराम - तुकाराम, तुकाराम’’ नामाचा अखंड जयघोषाने सारा आसमंत घुमत होता. सर्वधर्म समभावाची व त्यागाचे प्रतिक असलेली भगवी पताका खांद्यावर घेऊन सामाजिक एकतेचे दर्शन या सोहळ्यातून घडत असते. या ठिकाणी भाविकांची मांदिआळी पहायला मिळाली.
| तुका म्हणे ऐसे अर्त ज्याचे मनी |
|| त्याची चक्रपाणी वाट पाहे || या अभंगाप्रमाणे लाखो वारकरी आपल्या विठूरायाच्या दर्शनासाठी आतुरलेले होते. बुधवार ता. 18 पालखीचे प्रस्थान असल्याने येथील मुख्य मंदिर, वैकुंठ गमन मंदिर परिसरातील इंद्रायणी काठ सकाळपासूनच फुलून गेला होता. उपस्थित वारकरी विठ्ठल भक्तीचा हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवित होते. मुखी हरी नामाचा जयघोष होता, कशाचीही पर्वा न करता पावसाच्या सरी कोसळत असताना देखील पावले टाकत आपली प्रदक्षिणा घालत होते. पहाटे 4 वाजता काकडारती करण्यात आली. तदनंतर 4.30 वाजता संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, गणेश महाराज मोरे व वैभव महाराज मोरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. 5 वाजता श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील तुकोबाराच्या मुर्तीची महापुजा अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त गणेश महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. पहाटे 5.30 वाजता तपोनिधी नारायण महाराज मंदिरातील महापूजा विश्वस्त उमेश महाराज मोरे व लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी नऊ वाजता येथील घोडेकर सराफ यांनी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना चकाकी देण्यात आली. हे काम येथील ऋषिकेश घोडेकर यांनी केले.
पालखी सोहळ्याच्या काल्याचे किर्तन सकाळी 10 ते 12 यावेळेत पुंडलिक महाराज मोरे देहूकर यांनी "तुझिया संगती झाली/ आमुची निश्चिंती//" या अभंगाचे निरुपण केले. दरम्यानच्या काळात 10 वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पादुका घोडेकर सराफाच्यां कडून पालखी रथा पुढील पहिली मानाची सर्वात जुनी म्हातरबाबा पाथरुडकर दिंडीने गंगा म्हसलेकर या सेवेकऱ्यांनी डोक्यावर इनामदार वाड्यात आणल्या. पादुकांची परंपरागत विधीवत पूजा दिलीप महाराज मोरे गोसावी यांनी केली. या पादुका पालखीचे मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या. त्यांनी ह्या पादुका डोक्यावर घेऊन टाळ-मृदंग आणि तुतारी या वाद्यांसह सकाळी 11 वाजता टाळ मृदंगाच्या गजरात मुख्य मंदिरात भजनी मंडपात आणल्या. तत्पुर्वी कोल्हापूरच्या संस्थान शाहू महाराजांकडून मानाचे दोन जरीपटके मंदिरात आणण्यात आले. प्रदक्षिणा घालून हे जरिपटके संस्थानकडे सुपुर्त करण्यात आले. प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी सकाळ पासूनच देऊळवाड्यात मानाच्या दिंड्या, फडकरी व विणेकरी यांनी आपआपल्या क्रमांकावर येण्यास सुरूवात केली होती.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास होणारा सोहळा मुख्यमंत्री अर्धातास उशीराने आल्याने सुमारे 30 मिनिटे उशीराने पालखी प्रस्थान महापूजा सोहळ्यास प्रारंभ झाला. ग्रामोपाध्याय सुभाष टंकसाळे यांनी पाद्यपूजा, वरूणपूजा आणि कलशपुजन केले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार सुनिल शेळके व त्यांच्या पत्नी सारीका शेळके, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, विजय शिवतारे आमदार उमा खापरे, माजी आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, विभागीय अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, अप्पर तहसिलदार जयराज देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. तर सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंदिरात दर्शन घेऊन गेले होते. त्याच प्रमाणे चंद्रकांत पाटील व रविंद्र चव्हाण यांनी ही दर्शन घेऊन गेले होते.
संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे व गणेश महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे व लक्ष्मण महाराज मोरे यावेळी उपस्थित होते. महापूजेनंतर पालखीच्या प्रस्थान कार्यक्रमाला सुरुवात झाली. चोपदार नामदेव निवृत्ती गिराम, कानसुलकर, खांदेकरी गुंडाप्पा कांबळे, तानाजी कळमकर या मानकऱ्यांना सेवेकरी मंडळींचा देवस्थानच्या वतीने नारळप्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. परंपरेनुसार महाराजांच्या पादुका उपस्थितांच्या हस्ते फुलांनी सजवलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. त्यानंतर पालखी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भजनी मंडपातून प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. प्रदक्षिणेनंतर पालखी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावली. रात्री परंपरेप्रमाणे म्हातरबाबा पाथरुडकर यांचे किर्तन होणार आहे.