लोणावळ्यात 'वाय. सी. क्लासेस'तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

लोणावळा : शालेय शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची परंपरा जपणाऱ्या 'वाय. सी. क्लासेस, लोणावळा' तर्फे गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच लोणावळा नगरपालिकेच्या प्रियदर्शनी संकुलात उत्साहात पार पडला. प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही लोणावळा परिसरातील सर्व शाळांमधील इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज, लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिक्षण सभापती जितेंद्र कल्याणजी, ॲड. श्री. संजय पाटील, विशाल विकारी, गुरुकुल हायस्कूलचे मुख्याध्यापक बयाजी खुरंगे, व्ही. पी. एस शाळेचे पर्यवेक्षक विजय रसाळ, सामाजिक कार्यकर्ते वसंत कालेकर, वाय.सी क्लासचे प्रमुख निवृत्ती दुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कलाक्षेत्रातील अतिश थोरात, लेखन क्षेत्रात वैजयंती जगताप, वयाच्या 58 व्या वर्षी इ. 12 वी उत्तीर्ण झालेल्या बनताबाई काजळे-चोपडे, तसेच एमपीएससी परीक्षेत यशस्वी ठरलेले दत्ता शेडगे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. वाय. सी. क्लासेसचे संचालक श्री. निवृत्ती दुडे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि आजच्या विद्यार्थ्यांपुढील आव्हानांवर भाष्य केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत, चिकाटी व सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, वाय. सी. क्लासेसच्या विद्यार्थिनी अबोली बोडके हिने इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) मध्ये 93.83% गुण मिळवून लोणावळ्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर पूजा पांडे हिने अकाउंट विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या यशाचा गौरव देखील या मंचावर करण्यात आला. लोणावळ्यातील सर्व शाळांमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन पालकांसह सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी व आवाहने याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उजमा शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाय. सी. क्लासेसचे दीपेश गोणते, सुजाता आंबेकर, मयूर कनगुटकर, वाय. सी. क्लासेसचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी अथक मेहनत घेतली. फिजिकल शिक्षक कैलास येवले यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि पालकांचे आभार मानले.