Lonavala News l लोणावळ्यातील रेल्वे समस्यांबाबत मनसेच्या शिष्टमंडळाकडून केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन

लोणावळा : लोणावळा शहर व पुणे दरम्यानच्या रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या व सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोणावळा शहराध्यक्ष श्री. निखिल हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी (3 मे) केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. आश्विन वैष्णव आणि मावळचे खासदार श्री. श्रीरंग (आप्पा) बारणे यांची लोणावळा रेल्वे स्थानकावर भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने विस्तृत निवेदन सादर करत विविध मागण्या मांडल्या.
या निवेदनात पुणे–लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच सोयी-सुविधा वाढविण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत, स्टेशन परिसरात वाढलेल्या छेडछाड व चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची, प्रत्येक फलाटावर रेल्वे पोलीस तैनात करण्याची, तसेच स्वच्छतागृह, प्रतीक्षालय व तिकीट घराच्या सुविधांची मागणी करण्यात आली.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- भांगरवाडी–नांगरगाव उड्डाणपुलाचे काम तत्काळ सुरू करून लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करावा.
- कोरोना काळात बंद झालेल्या लांब पल्ल्याच्या (फास्ट) एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा लोणावळा स्टेशनवर पूर्ववत करावा.
- प्रत्येक रेल्वे स्थानकावर अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
- प्रत्येक फलाटावर किमान दोन रेल्वे पोलीस कर्मचारी तैनात करावेत.
- प्रत्येक फलाटावर स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी करून स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमावेत.
- प्रवाशांची संख्या लक्षात घेता तिकीट खिडकी (बुकिंग काउंटर) किमान दोन असाव्यात.
- महिलांसाठी प्रतीक्षालय व ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात यावेत.
- प्रत्येक स्थानकावर मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांची माहिती देणारे फलक लावावेत.
या शिष्टमंडळात मनसे अध्यक्ष निखिल भोसले, रमेश म्हाळसकर, उपाध्यक्ष दिनेश कालेकर, संघटक अभिजीत फासगे, कार्यकर्ते विश्रांत साठे, किशोर साठे, जुबेर मुल्ला, संदीप बोभाटे आदी उपस्थित होते. मनसेकडून या समस्यांवर सकारात्मक विचार करून त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अशी विनंती केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना करण्यात आली आहे.